शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत…

जळगाव : शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार तसेच २० माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले.

गुलाबराव पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र, उद्धव ठाकरेंना आम्ही सोडले नाही उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडले. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केला आहे. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बंडखोर माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ती आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करावे, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला.