गॅसचा भडका; पेट्रोल-डिझेलही महागले

 
नवी दिल्ली : घरगुती वापराचा गॅस सिलिंडर आज ५० रुपयांनी महागला तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही अनुक्रमे ८० आणि ७८ पैसे प्रति लिटर एवढी वाढ झाली. पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर आज पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात १३० डॉलर्स बॅरल एवढी भरमसाठ वाढ झाली होती. ती आता १०० डॉलर्सपर्यंत कमी झाली आहे. परंतु इंडियन ऑइलने आज जवळपास साडेचार महिन्यांनी इंधन दरवाढ केली. त्यात पेट्रोल ८० पैसे आणि डिझेल ७८ पैसे प्रति लिटर महागले आहे. या दरवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल ११० रुपये ८२ पैसे, तर डिझेल ९५ रुपये लिटर झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६ रुपये २१ पैसे आणि डिझेल ८७ रुपये ४७ पैसे लिटर झाले आहे.

याशिवाय घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरातही आज ५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीत गॅस सिलिंडर ९४९ रुपये ५० पैसे झाला आहे. यापूर्वी हा गॅस सिलिंडर ८९९ रुपये ५० पैसे होता. तर यापूर्वी ६ ऑक्टोबर २०२१ मध्ये गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करावी लागली, असे तेल कंपन्यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धही याला कारणीभूत आहे.