मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक : श्रीकांत देशपांडे


कोल्हापूर :  उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ देवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षि शाहूजी सभागृहात देशपांडे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, प्रांताधिकारी अमित माळी आदी उपस्थित होते.

देशपांडे पुढे म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी जास्तीत-जास्त असिस्टंटची नियुक्ती करावी. तसेच आदर्श आचारसंहितेच्या पालनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. प्रशासनाने B L O ची संख्या वाढवावी, असे निर्देश देवून ते म्हणाले, निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून ‘सी व्हीजल ॲप’ बनविले आहे. याचा वापर पदाधिकाऱ्यांनी करावा. त्याचबरोबर मतदात्यांनी ‘वोटर्स हेल्पलाईन ॲप’ चा वापर करुन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 311 मूळ व 47 सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण 358 मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात 11 हजार वरिष्ठ मतदार (सिनिअर सिटीझन) आहेत तर 249 दिव्यांग मतदार असल्याची माहिती देवून या निवडणुकीत मतदात्यांनी कोविडच्या नियमांचे पालन करून मतदान टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.

या बैठकीसाठी इंडियन नॅशनल कॉग्रेसचे संजय पोवार (वाईकर), बंडोपंत मालप, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सुनिल देसाई, भाजपाचे चंद्रकांत घाटगे, बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे, माकपचे शंकर काटाळे, लोकराज्य जनता पार्टीचे शशिकांत जाधव व आम आदमी पक्षाचे अभिजीत कांबळे आदी उपस्थित होते.