कोल्हापूर: पशुधनातील संतुलित आहार आणि वैरण पिकांच्या लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात पशुधनातील आहाराचे व्यवस्थापन, निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा निर्मिती आणि वंधत्व निवारणामध्ये चारा पिकांचे महत्त्व या विषयांवर पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातील दोन अशा जिल्ह्यातील उपस्थित शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मका बियाणांचे वाटपही करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. या जिल्ह्यात कृषी संपन्नता आहे. त्यामुळे पाळीव पशूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकऱ्यांनी हे पशुधन प्रयत्नपूर्वक जोपासावे. दुग्ध व कृषी क्षेत्रातून शेतकऱ्यांनी स्वतःसह कुटुंबियांचे अर्थार्जन करावे. लोकहिताची सच्ची चळवळ म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहावे. तसेच जिल्हा परिषदेचा कृषी-पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आत्मा आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, कृषी-पशुसंवर्धन व दुग्ध समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, महिला बाल कल्याण सभापती विद्या पाटील, शिक्षण सभापती शितल यादव, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषद सदस्य अरुणराव जाधव, माजी बाजार समिती संचालक कल्याणराव निकम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
