कोल्हापूर: कृषी विभागाच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कार्यक्रमांतर्गत आज आजरा तालुक्यातील मसोली गावात रोपलावणीच्या कामात मंत्री प्रकाश आबिटकर सहभागी झाले आणि त्यांनी बळीराजासोबत बांधावर संवाद साधत झुणका-भाकरीचा आस्वादही घेतला.

मंत्र्यापासून ते आमदारापर्यंत व जिल्हाधिकाऱ्यापासून ते सहायक कृषी अधिकारी, तलाठ्यापर्यंत सर्वांना सामावून घेणारा हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय असून यामध्ये फक्त शासन, प्रशासनच नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांनीही भाग घेतला ही बाब कौतुकास्पद आहे.
केवळ एका दिवसासाठी नाही तर सातत्याने शेतकऱ्याच्या विकासासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी आणि जगाचा अन्नदाता असलेल्या बळीराजासाठी प्रयत्नशील असून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, अशी भावना मंत्री आबिटकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना याप्रसंगी व्यक्त केली.
तसेच आजच्या दिवशी हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभही करण्यात आला. ५ लाख वृक्षांची लागवड करत ५ तालुक्यांमध्ये १ लाख काजू कलमांचेही मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी हरीश सुळ, तहसीलदार समीर माने, सरपंच चंद्रकांत गुरव यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
