गोकुळ वाचविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटील यांची साद

कोल्हापूर : गोकुळ ही दूध उत्पादकांची संस्था असून ती वाचविण्यासाठी सर्वांनी गावपातळीवरील राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडी सोबत एकत्र या अशी साद आमदार सतेज पाटील यांनी सभासदांना घातली. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील ठरावधारकांनी राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीला जाहीर पाठींबा दिला. यावेळी अजिंक्यतारा कार्यालय येथे आयोजित ठरावधारकांच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या गेल्या 5 वर्षांतील कारभाराचा आढावा घेतला.

 

 

आमदार सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासात राजर्षी शाहू महाराजांचे योगदान मोठे आहे. स्वर्गीय आनंदराव चुयेकर यांच्या प्रयत्नांतून गोकुळ दूध संघाची स्थापना झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात गोकुळने मोलाची भूमिका बजावली. “ऊसाचा पैसा खर्चासाठी उपयोगी पडतो, पण दुधाचा पैसा शिल्लक राहतो. त्यामुळे शेतकरी स्वाभिमानाने उभा राहिला. गेल्या पाच वर्षांतील गोकुळच्या कामकाजाचा उल्लेख करताना त्यांनी दूध दरात मोठी वाढ केल्याचे सांगितले. मुंबईमध्ये जागा घेऊन आधुनिक पॅकिंग प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याचे कर्ज अवघ्या 3 वर्षांत फेडले. सौरऊर्जा प्रकल्प उभारून संस्थेला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून दिला, त्यातून दरवर्षी 4 ते 5 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लंपी आजाराच्या काळात म्हशींच्या लसीकरणासाठी गोकुळने मोठ्या प्रमाणावर काम केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. गोकुळ संस्था टिकली तरच दूध उत्पादक टिकतील. त्यामुळे संस्था वाचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

 

दुध उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे आणि कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गावातील स्थानिक राजकारण काहीही असले, तरी गोकुळच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावे. दूध उत्पादकांची सत्ता गोकुळमध्ये आणण्यासाठी आणि त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार, असे सांगत त्यांनी ठरावधारकांना एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

सर्व दुध उत्पादकांचा आमदार सतेज पाटील यांच्यावर विश्वास असून ते त्यांच्या पाठीशी ठामपणे राहतील, असा विश्वास बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जीवन पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सचिन घोरपडे यांनी, सध्याची परिस्थिती पाहता गोकुळ दूध संघाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांच्या हाती द्यावे, अशी जिल्ह्यातील बहुतांश दूध उत्पादक व ठरावधारकांची भावना असल्याचे सांगितले. गोकुळसारखी संस्था सक्षम नेतृत्वाखाली राहणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रकाश पाटील यांनी, “गोकुळ ही कोल्हापूरच्या मातीतून उभी राहिलेली संस्था आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता गोकुळच्या हितासाठी लढणाऱ्या बंटी पाटील यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असे सांगितले.

यावेळी बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जीवन पाटील, सचिन घोरपडे, शिवसेना उबाठा गटाचे प्रकाश पाटील, अमर पाटील, एस. एम. पाटील, एन. के. देसाई, भुजंगराव मगदूम, बाबासो देसाई, दिलीप केणे, सागर देसाई, अमर बरकाळे, अमोल पाटील, ऋषिकेश पाटील, नेताजी आरडे, विश्वजीत हाप्पे, जयवंत पाटील यांच्यासह ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706