मुंबई:भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीनं मुंबईतून युवाशक्ती जागर यात्रा सुरू झाली आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सुरू झालेल्या जागर यात्रेच्या शुभारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित होते. मुंबईतून सुरू झालेली ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून, युवा कार्यकर्त्यांचं संघटन आणि भाजप सरकारची लोककल्याणकारी ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल, असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.

मुंबईतील भाजपच्या मुख्यालयापासून या यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी केलेले तडाखेबाज भाषण चांगलेच गाजत आहे. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस केवळ आपले नेते किंवा गुरू नाहीत, तर माझ्यासाठी विद्यापीठ आहेत. त्यामुळे जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्याला थांबवू शकणार नाहीत, अशी भावना कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवली. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणे हे सुध्दा भाग्याचे असून, सबका साथ-सबका विकास ही पंतप्रधान मोदींची घोषणा सत्यात आणण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाभारतातील श्रीकृष्णाचा दाखला देवून कृष्णराज महाडिक यांनी आपणही युवा कार्यकर्त्यांसाठी सारथी म्हणून काम करण्यास तयार आहे, असे बोलून दाखवले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी युवाशक्ती जागर यात्रेला शुभेच्छा देवून, युवा पिढी हीच भारताचे बलस्थान असल्याचे नमुद केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना युवाशक्ती जागर यात्रा एक नवा इतिहास निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला. युवाशक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरीत करण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी तरूणाईची ताकद लागावी, यासाठी ही यात्रा महत्वपूर्ण ठरेल, असे नामदार फडणवीस म्हणाले. भारतात ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे. या उर्जेला योग्य वळण देण्यासाठी आणि युवा मोर्चाचे संघटन वाढवण्यासाठी ही यात्रा उपयुक्त ठरेल, असा विश्वास नामदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित महिला आरक्षणाला विरोध केला. त्याबद्दलही या जागर यात्रेतून लोकांपर्यंत माहिती द्यावी आणि नेहमीच खोटे बोलणार्या विरोधकांचा खरा चेहरा जगासमोर आणावा, अशी सुचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षांनी लोकशाहीचा आणि नारीशक्तीचा अवमान केला आहे. युवकांनी त्याचा जाब विचारला पाहीजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आजपासून सुरू झालेली ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाणार असून, त्यातून भाजपचे युवा कार्यकर्ते रिचार्ज होतील. यावेळी नामदार नितेश राणे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते उपस्थित होते.
