कुरुंदवाड : रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळ, कुरुंदवाड यांच्या वतीने राष्ट्रीय गोमाता सन्मान दिनानिमित्त नव्याने उभारण्यात आलेल्या गोशाळेचे उद्घाटन, गोमाता पूजन आणि भव्य गोमाता मिरवणूक उत्साहात पार पडली.

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना राम शिंदे यांनी संस्कृतीत गोमातेचे धार्मिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. गोसंवर्धन, नैसर्गिक शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी गोशाळांची भूमिका महत्त्वाची आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच शाश्वत शेतीला चालना मिळते असे प्रतिपादन करण्यात आले. गोसेवा ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजहित आणि ग्रामीण विकासाशी निगडित एक महत्त्वपूर्ण चळवळ आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला आ . राहुल आवाडे,आमदार अशोक माने, अजय पाटील यड्रावकर, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे, रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. रामचंद्र डांगे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, महाराष्ट्र धनगर समाज युवक आघाडीचे अध्यक्ष घनश्याम हाके यांच्यासह उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्त्यांनी गोमातेची मिरवणूक काढून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले होते.
