मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ‘महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळा 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधत असून संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य प्रकारे वापर होतो किंवा नाही यावर अंकुश ठेवण्याचे काम हा स्तंभ सातत्याने करीत असतो. एकेकाळी एका अग्रलेखाने सरकार खडबडून जागे व्हायचे, अडचणीत यायचे. पण, पुढे माध्यमे बदलली, प्रिंट माध्यमाकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमे, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया, असा प्रवास होत गेला. त्या त्या पद्धतीने त्या त्या माध्यमांची काळ व वेळेनुसार मूल्ये ठरत गेली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अमेरिकेची तत्कालीन अध्यक्षीय निवडणूक, त्यातील उमेदवार जॉन एफ. केनेडी आणि रिचर्ड निक्सन यांच्यातील निवडणूकपूर्व डिबेट व तेव्हा पत्रकारिता करणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांची आठवण सांगितली. तोपर्यंत रेडिओवर प्रसारित होणारी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील दोन्ही उमेदवारांची डिबेट पहिल्यांदाच टिव्हीवर प्रसारित झाली. त्यात ज्यांनी रेडिओवर डिबेट ऐकली त्यांच्यामध्ये रिचर्ड निक्सन लोकप्रिय होते आणि ज्यांनी टीव्हीवर डिबेट पाहिली त्यांच्यात जॉन एफ. केनेडी लोकप्रिय होते, असा तपशील समोर आला. तेव्हापासून राजकारण किंवा राजकारणाचे नॅरेटीव्ह शेपिंग बदलले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज पत्रकारितेसमोर, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर सर्वाधिक आव्हाने आहेत. अनेकदा सत्तास्थापनेसारख्या काळात एक बातमी मिळवण्यासाठी कॅमेरामन, पत्रकार यांना 22-22 तास उभे राहावे लागते. सकाळी 6 वाजल्यापासून, गाडीच्या मागे धावणारे पत्रकार पाहायला मिळतात. यातही महिला पत्रकारांचे विशेष कौतुक वाटते, कारण त्यांना घर आणि बाहेरचे काम दोन्ही सांभाळावे लागते. बऱ्याच ठिकाणी मूलभूत सुविधांची व्यवस्था नसते, अशा स्थितीतही दिवस काढावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये पुरस्कार आवश्यक ठरतात. कारण त्यामुळे कामाची दखल घेतली जाते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच, पत्रकारांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते, निर्णय घेत असते. पुढील काळात पत्रकारांचे जीवन सुकर व्हावे, याकरिता आवश्यक असेल ते निर्णय आमचे सरकार निश्चित घेईल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
🤙 9921334545