मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेवर आता संजय राऊत यांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी ( १२ नोव्हेंबर ) यांना लक्ष्य केलं होतं. ‘मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही,’ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपानं तुमचा बार उडवला आहे, ते आधी पाहा, असा हल्लाबोल संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “३१ डिसेंबरनंतर तुमचं मुख्यमंत्रीपद जाऊद्या. मग, तुमचा बार कुठून उडेल ते पाहा. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ५० वर्षे झालं शिवसेनेचा बार उडतो आहे. भाजपाने तुमचा बार उडवला आहे. दिल्लीतील भाजपाच्या चरणदासांमुळे मराठी माणसांची बेअब्रू गेली आहे. त्यांनी शिवसेनेला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये.”

“मुंब्य्रात हजारे शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत संघर्ष टाळला. पण, सत्ता आणि पोलीस नसते, तर चित्र वेगळं असतं. दिवाळीमुळे आम्ही संयम राखला. मुख्यमंत्र्यांनी याचे उपकार मानले पाहिजेत,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.

लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदार भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे, याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊतांनी म्हटलं, “ते आताच भाजपात आहेत. आमदारांच्या अंतर्वस्त्रांमध्ये कमळच आहे. त्यांनी फूल पँन्टमध्ये खाकी घालायला सुरूवात केली आहे. गुलामांना स्वत:चं मत आणि स्वाभीमान नसतो.”