सोनार समाजाचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : सोनार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागणीसह सोनार कारागिरी व सोनार समाजातील कलावंत यांच्यासाठी बार्टी, महाज्योती, सारथी इत्यादीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्माण करण्यात यावी, थोर समाज सुधारक मुंबई नगरीचे जनक नाना शंकरशेट यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या व अशा अन्य मागण्यांसाठी सोनार समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

अल्प समाज असलेल्या सोनारांना आर्थिक सहाय्य करून समाज जीवित ठेवावा म्हणून आम्ही आमच्या मागण्या मागत आहोत परंतु आमच्या हातात कथलाचा वाळा पडला आहे.

आम्हाला व्यवस्थित जगता यावे व ही कला जिवंत राहावी म्हणून आम्ही शासन दरबारी न्याय मागणे हा काय गुन्हा आहे का ? असा सवालही यावेळी सोनार समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.यावेळी ‘सोनार समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत’, ‘सोनार महामंडळ झालेच पाहिजे ‘असे फलक लक्ष वेधून घेत होते.यावेळी पंचाल सोनार समाजाचे अध्यक्ष अनिल पोतदार, नचिकेत भुर्के, अनिश पोतदार, अण्णा पोतदार, राजेंद्र पोतदार ,रत्नाकर कारेकर ,प्रमोद पेडणेकर, दिगंबर लोहार, शिवानंद पोतदार, रवींद्र पोतदार आदी उपस्थित होते.