अंगणवाडी सेविकांचा पन्हाळा पंचायत समितीवर मोर्चा..

पन्हाळा : अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचा २० फेब्रुवारी पासून  विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप आहे. त्या संबंधी आज पन्हाळा पंचायत समितीवर निवेदन देण्यासाठी मोर्चा काढून निवेदन दिले.

यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र निवेदन स्विकारण्यासाठी गटविकास अधिकार्‍यांसह एकात्मिक बालविकास विभागामध्ये एक ही कर्मचारी हजर नसल्याने मोर्चा घेऊन आलेल्या महिलांना पन्हाळा पंचायत समितीच्या दारात तासभर दिष्टत बसून राहावे लागल्याने मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांसह कर्मचार्‍याबद्दल संताप व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज पन्हाळा पंचायत समितीवर मोर्चाचे नियोजन केले होते.अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी २० फेब्रुवारी पासून राज्यव्यापी बेमुदत संपाची नोटीस देण्यासाठी तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका पंचायत समितीमध्ये आल्या होत्या मात्र पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अगर एकात्मिक बालविकास विभागात महिला शिपाई वगळता कोणीही उपस्थित नसल्याने उपस्थित महिलांनी संताप व्यक्त केला.नोटीस देण्यासाठी तासभर पंचायत समितीच्या दारातचं महिलांना तिष्टत बसावे लागले. नरवीर बाजीप्रभू पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत पंचायत समितीच्या दारात मोर्चा पोहचला. विविध मागण्यांचे निवेदन अखेर कक्षअधिकारी एम.पी.पाडवी यांना देण्यात आले.

राज्यात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी असून अंगणवाडी l सेविकांना दरमहा आठ हजार तीनशे तसेच मिनी अंगणवाडी सेविकांना पाच हजार आठशे रुपये, मदतनीसना चार हजार दोनशे रुपये एव्हढेच मानधन मिळते. या कर्मचा-यांना कामगार कल्याण कायद्याचे संरक्षण व लाभ मिळत नाहीत, तसेच वाढत्या महागाईनुसार महागाई भत्ताही मिळत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका सोमवार दि. २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अंगणवाडी सेविकांना मिळावा, आश्वासनाची पूर्तता करावी, ग्रॅच्युइटी मिळावी, यासह विविध मागण्या या निवेदनात मांडल्या आहेत.

यावेळी जयश्री माने, मंदा चांदणे,सुरेखा जाधव,सुनंदा चोपडे, शुभांगी माळी, अरूणा कुंभार, दिलशाद नदाफ, कल्पना गायकवाड, संगीता कोळी तसेच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.