ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

रायगड : रेवदंडा (जि. रायगड) येथील ज्येष्ठ निरुपणकार डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणेजच २७ वा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे अनुयायी असलेल्या जगभरातील लाखो-करोडो श्रीसदस्य आनंदोत्सव साजरा करत आहे.

महाराष्ट्र भूषण स्व. डॉ नारायण उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र असलेले दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अध्यात्म आणि सामाजिक सेवेचा त्यांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आहे. त्यांच्या पत्नी स्व. अनिता धर्माधिकारी यांची त्यांना यात मोलाची साथ लाभली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ सचिन दादा धर्माधिकारी हे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन समाजसेवेचा आणि अध्यात्मविद्येचा वारसा चालवत आहेत. स्व. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात पिता-पुत्रांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.