राज्य सरकार ७५ हजार जागा भरणार…

मुंबई (वृत्तसंस्था) : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात ७५ हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. २ हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील. पण हा शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटची संधी समजू नका, कोर्टात जाऊन जागा अडवू नका किंवा स्थगिती आणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महासंकल्प रोजगार मेळाव्याची सुरुवात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राज्यातील तरुणांच्या रोजगाराच्या पूर्ततेची सुरुवात राज्य सरकारने केली आहे. केंद्र सरकार आपल्या केंद्रीय विभागात १० लाख नोकऱ्या देणार आहे. राज्यानेही आपल्या राज्यात तरुण तरुणींना रोजगार द्याव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्यानंतर पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे”.

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार ७५  हजार जागा भरणार आहे. शासकीय नोकरीत अघोषित बंदी आहे ती संपवावी असा निर्धार सरकारने केला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. येत्या काळात साडे १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात काढत आहोत.  ग्राम विकास विभागतदेखील आपण काही पदं भरणार आहोत.  सरकारी नोकऱ्या या पारदर्शी झाल्या पाहिजेत. मागच्या काळात जे घोटाळा पाहायला मिळाले तसे होणार नाही. देशात ज्या बेस्ट एजन्सी आहेत त्यांना काम दिलं पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

या महासंकल्प कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.