माध्यमांवर नियंत्रण ठेऊन त्याचा प्रभावी वापर करावा-डॉ.देवव्रत हर्षे

कसबा बावडा प्रतिनिधी : सध्याच्या काळात सोशल मिडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरूण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत. मात्र कोणतेही माध्यम वाईट नसते, त्याचा वापर व त्यासाठीची वेळ यावर नियंत्रण ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ व डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या मानसोपचार विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.देवव्रत हर्षे यांनी केले.

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने (आयसीसी) माध्यमांच्या व्यसनातून मुक्ती (मीडिया डी अॅडिक्शन) या विषयावरील चर्चासत्रामध्ये डॉ.हर्षे बोलत होते.

सध्याची युवा पिढी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ट्वीटर त्याचबरोबर टी.व्ही., ओ.टी.टी अशा विविध माध्यमावर सतत व्यस्त असते. इंटरनेटमुळे कोणतीही माहिती त्वरित उपलब्ध होते. इंटरनेट, गेम यामुळे अनेकाना या माध्यमांचे व्यसन लागल्याची स्थिती आहे. हे व्यसन मानसिक ताण, नैराश्य व त्या अनुशंगाने विविध आजारानाही निमंत्रण देत आहेट. त्यामुळे या व्यसनातून मुक्त होण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

न्यूरोमार्केटिंग, हॉट माइक इत्यादी मार्केटिंग तंत्र वापरून काही माध्यमे आपल्या मनाचा ताबा घेत आहे. यापासून कसे सावध राहायचे आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे याबाबाबत डॉ.  हर्षे यांनी मार्गदर्शन केले. मीडियाचा सुरक्षित आणि प्रभावी वापर कसा करावा याबाबतही त्यांनी आपली मते मांडली.

कोणतेही माध्यम वाईट नसते. आजच्या स्पर्धात्मक व तंत्रज्ञानपूरक युगात माध्यामंचा वापर अनिवार्य आहे. अनेक लोकांचे करिअर माध्यमावरच अवलंबून असते. मात्र, माध्यमांचे नियंत्रण आपल्यावर नसावे तर आपले नियंत्रण माध्यमांवर असले पाहिजे. हे तत्व पाळून माध्यमांचा प्रभावी वापर केल्यास सर्वांचेच जीवन सुकर बनेल असा विश्वास डॉ. हर्षे यांनी व्यक्त केला.

यावेळी प्राचार्य डॉ संतोष चेडे, आयसीसीच्या प्रिसायडिंग ऑफिसर प्रा.नीला जिरगे, डेटा सायन्स विभागाच्या प्रभारी डॉ ज्योती जाधव, प्रा. शताक्षी कोकाटे यांच्यासह आयसीसी सदस्य आणि 250 हुन अधिक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. निराली गिलबिले व प्रा. रसिका हावळ यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.