कागल :शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्याचे कामकाज करताना कामगारांना कुटुंबातील सदस्य मानून जिव्हाळ्याने वागणूक दिली. त्यांच्या याच विचारांमुळे शाहू साखर कारखान्यात प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात विश्वासाचे,आपुलकीचे आणि स्नेहाचे नाते निर्माण झाले.कारखान्याच्या यश, नावलौकिक आणि प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे.

असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका तथा शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर गतवर्षभरात सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त कर्मचाऱ्यांना सहाय्य अशा संयुक्त कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपल्या कुटुंबापेक्षाही कारखाना आणि कर्मचाऱ्यांना अधिक वेळ दिला. कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले. त्यांच्याशी असलेले हे ऋणानुबंध भविष्यातही अधिक दृढ करण्यासाठी शाहू उद्योग समूह कटिबद्ध राहील.राजेसाहेबांनी रुजविलेली कर्मचारीहिताची परंपरा भविष्यातही कायम ठेवू.
कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, राजेसाहेबांनी कर्मचारी कल्याणासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. कर्मचाऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आयुष्यात स्थैर्य प्राप्त करावे, यासाठी त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. त्यामुळे शाहू कारखान्याच्या कामगारांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावली आहे.
यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक-संचालिका तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
