गर्भधारणेपूर्वी नवजात शिशूंमधील मेंदूशी संबंधीत आजार टाळता येतात- डॉ.प्रकाश संघवी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गर्भधारणेपूर्वी महिलांनी योग्य खबरदारी घेतली तर नवजात शिशूंमध्ये जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार टाळता येतात, असे प्रतिपादन प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी केले. श्रीनगर (जम्मू काश्मिर) मध्ये आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, नवजात शिशूंमध्ये जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार उद्भवण्याचे प्रमाण केवळ तीन टक्के आहे. हे प्रमाण अत्यल्प दिसत असले तरी, जन्मजात मेंदूशी संबंधीत आजाराचे बालक जन्माला आल्यास, त्या बालकाला आणि त्याच्या कुटूंबियांनाही अनेक समस्यांना आयुष्यभर तोंड द्यावे लागते. या पार्श्‍वभूमीवर जम्मू काश्मिरची राजधानी श्रीनगर मध्ये नुकतीच जन्मजात बालरूग्ण मेंदू तज्ञांची राष्ट्रीयस्तरावरील परिषद पार पडली. यामध्ये गेल्या ३८ वर्षाहून अधिककाळ नवजात शिशूंचे विविध आजार आणि प्री मॅच्युअर शिशूंवर विशेष अभ्यास असणारे डॉ. प्रकाश संघवी यांचे  बीज भाषण झाले. यामध्ये संपूर्ण देशभरातील ७०० बालरोगतज्ञ सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना डॉ.प्रकाश संघवी यांनी, गर्भधारणेपूर्वी तीन महिने अगोदर तसेच प्रसुती होईपर्यंतही मातांनी फॉलिक ऍसिड या गोळ्यांचं सेवन करून योग्य खबरदारी घेतली तर नवजात शिशूंमधील जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार टाळता येतात, असं मत व्यक्त केलं.

नवजात शिशूंमध्ये रक्तातील साखर कमी होणे, ऑक्सिजन, कॅल्शियम, व्हीटॅमिनची कमतरता, जंतू संसर्ग या आजाराचे लवकर निदान होवून, त्यावर वेळीच औषधोपचार केल्यास हे आजार सुध्दा प्रामुख्याने आढळतात. हे सर्व आजार सुद्धा मातांनी गरोदरपणात योग्य खबरदारी आणि काळजी घेतली तर टाळता येतात असं असंही मत डॉक्टर प्रकाश संघवी यांनी परिषदेमध्ये व्यक्त केल टाळण्यासाठी फॉलिक ऍसिड . या गोळीची किंमत अगदी नाममात्र म्हणजे २५ पैसे ते ३ रूपये इतकी असल्याचेही डॉ. संघवी यांनी सांगितले.