गोकुळच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

कोल्‍हापूर प्रतिनिधी: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने लम्पी त्वचारोगाबाबत शासनामार्फत उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.चेअरमन विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आले.

बाधित जनावरांचे विलगीकरण करून त्याची छावणी तयार करण्यात यावी,ग्रामपंचायत मार्फत लम्पी त्वचा रोगा बाबत जनजागृती करून डास, माश्या,गोचीड, कीटक-नाशक यांचा प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी, गांवामध्ये आढळून आलेल्या लम्पी बाधित जनावरांच्या ग्रामपंचायत मार्फत नोंदी घेवून पशुसंवर्धन विभागास कळविण्यात याव्यात, मृत जनावरांचा मृतदेह उघड्यावर न टाकता शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी, बाहेरून जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जनावरांचे लम्पी लसीकरण केल्याची खात्री करूनच प्रवेश द्यावेत, लम्पी आजार हा फक्त गाय वर्ग मध्ये होत असल्याने बाहेर राज्यातून म्हैशी खरेदीस शासनामार्फत परवानगी     द्यावी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी.डी.ओ वतालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांची एकत्र गोकुळच्या संचालक मंडळासोबत व अधिकाऱ्यांसोबत लम्पी आजार बाबत आढावा बैठक घेण्यात यावी या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लम्पी आजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना गाव पातळीवर राबविण्यासंबधी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी.डी.ओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात येणार असल्याचे सागितले.

यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक नवीद मुश्रीफ, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश दळवी, पशुसंवर्धन उपआयुक्त वा.ए.पठाण, उपस्थित होते.