परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीची धाड

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे व रत्नागिरीसह एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात ही छापेमारी सुरू आहे.

अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आले. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचे कळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पुण्यातील मालमत्तांवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासातले नेते म्हणून अनिल परब यांना ओळखले जातात. परिवहन विभागातील बदल्या आणि अनधिकृत रिसॉर्टसह आणखी काही प्रकरणांमध्ये अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राहत्या घरी आणि शासकीय निवासस्थानासह एकूण ७ जागांवर ईडीने छापेमारी केली आहे. सकाळीच ईडीने छापेमारी केली आहे. दरम्यान भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना यापूर्वीच कारवाई होणार असल्याचा इशारा दिला होता.
अनेक प्रकरणांवर परब यांची चौकशी सुरु आहे. परंतु माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यासंबंधित प्रकरण तसेच रिसॉर्टशी संबंधित प्रकरणामुळे अनिल परब यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.