अशोक धोंगे यांनी पुन्हा स्वीकारला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता पदाचा  कार्यभार पुन्हा अशोक धोंगे यांच्याकडे पूर्ववत आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोंगे यांनी आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता कार्यभार स्वीकारला.

   जिल्हा परिषदेच्या यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत धोंगे यांच्या कामकाजावर आक्षेप ठेवत त्यांना कार्यमुक्त करावे, असा आग्रह सदस्य हंबीरराव पाटील व विजय बोरगे यांनी धरला होता, त्यानंतर धोंगे यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश देण्यात आला. मात्र कार्यमुक्त करण्याच्या निर्यायाविरोधात घोंगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात स्वागत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

     ज्यावेळी धोगे यांना कार्यमुक्तीचा आदेश देण्यात आला. या निर्णयाविरोधात बहुतांशी सदस्यांमध्ये नाराजी पसरली होती. आज जिल्हा परिषदेमध्ये अनेक माजी सदस्यांनी धोंगे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर दिला.

     मात्र, यामुळे धोंगे यांना तात्काळ कार्यमुक्त करणारे अधिकारी व कार्यमुक्त करायला सांगणारे मंत्री अक्षरशा तोंडाघशी पडले आहेत. त्याचबरोबर धोंगे यांना किरकोळ कारणावरून कार्यमुक्त करण्याचा आग्रह धरून, त्या ठिकाणी आपला अधिकारी बसवण्यासाठी मंत्रालयापर्यंत आपली ताकद पणाला लावणारे माजी सदस्य व संबंधित अधिकारी यांची मोठी गोची झाल्याची चर्चा आज जिल्हा परिषदेच्या काही माजी सदस्य व  अधिकाऱ्यांत दबक्या आवाजात होती.