गगनबावड्यातील शासकीय कार्यालयांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाडाझडती !

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा हा दुर्गम आणि जिल्ह्याच्या एका टोकाला असलेला दुर्लक्षित तालुका आहे. येथील शासकीय कार्यालयात कर्मचारी वर्गाच्या अनुपस्थितीमुळे तसेच त्यांच्या येण्या-जाण्याची वेळावर नियंत्रण नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शासकीय कामासाठी खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे शासकीय कार्यालयांची गगनबावडा राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाडाझडती घेण्यात आली.

तालुक्यात निवासी नसलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे येणे व जाणे हे केवळ औटघटकेचे ठरत असून नागरिकांना मात्र कामासाठी ताटकळत बसावे लागते. कार्यालयातील कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत, दांड्या मारतात. त्यामुळे उद्या, परवा या, असे सांगितले जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा हेलपाटे मारणे त्रासदायक ठरते, गोरगरिबांचा रोजगार बुडतो आणि नाहक आर्थिक भुर्दंडही बसतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्व शासकीय कार्यालयांना भेटी देत झाडाझडती घेण्यात आली. कर्मचाऱ्यांची हजेरी, प्रलंबित कामे याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, कृषी विभाग, भूमिअभिलेख, महावितरण, पोलीस स्टेशन यांच्या प्रमुखाना भेटून होणाऱ्या अडचणीबद्दल जाब विचारला व यापुढे चांगल्या कामकाजाबद्दल अपेक्षाही केली.  यापुढे आमच्या आकस्मिक भेटीत सुधारणा होईल याची अपेक्षा व्यक्त करताना चांगल्या कामकाजाचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

   सामाजिक न्याय सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष जी. एस. कांबळे, तालुका कार्याध्यक्ष दिलीप पाटील,  अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शब्बीर नाचरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी महिला सेलच्या तालुकाध्यक्ष शबाना थोडगे, युवती सेलच्या तालुकाध्यक्ष हिना पाटणकर,  युवक सेलचे तालुकाध्यक्ष श्रीकांत तातु कांबळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष कृष्णात चिले,  साजिद जमादार यांच्यासह सर्व सेलचे प्रमुख उपस्थित होते.