गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख देवस्थान असणाऱ्या वाघापूर (ता. भुदरगड) येथील नागदैवत श्री जोतिर्लिंग मंदिराचा गेल्या अनेक वर्षापासून जिर्णोध्दार झालेला नसून मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021-22 मधून 3 कोटी 49 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र-कर्नाटकासह लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील वाघापूरमधील श्री जोतिर्लिंग – नागदैवत प्रसिद्ध आहे. नागपंचमीला दरवर्षी याठिकाणी लाखो भाविक मोठ्या भक्तिमय वातावरणात एकत्र येत नागपंचमी साजरी करतात. या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यासाठी गेली अनेक वर्षे निधी मिळावा याकरीता प्रयत्नशील होतो. काही कारणास्तव त्यास यश आले नाही. सन २०१९ च्या निवडणूकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारकडे निधीसाठी प्रयत्न चालूच ठेवले होते. या मागणीला यश आले असून पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंदिराचा जिर्णोध्दार करण्यासाठी 3 कोटी 49 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे मंदिराचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे.