शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त सापडला !

पुणे : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली असून शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त सापडला आहे. यावर्षी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली.

दरम्यान, याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षांचे अर्ज अजूनही भरले नाही. त्यांनासुद्धा अर्ज भरण्यासाठी अखेरची संधी देण्यात येणार असल्याचे परिक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाते. यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारीला परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेचे डिसेंबर महिन्याचा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने, अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कधी होणार या प्रश्नाचं उत्तर अखेरीस मिळालं आहे. जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर या परीक्षा घेण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे.