पाटणेतील शेतकऱ्याच्या मुलीची पीएसआय पदाला गवसणी

सरूड (वार्ताहर) : पाटणे (ता.शाहूवाडी) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शितल राजाराम पाटील हिने प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘पीएसआय’ पदाला गवसणी घातली आहे. निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करीत गावकऱ्यांनी तिची मिरवणूक काढली.


आई-वडील शेतकरी, घरची परिस्थिती तशी बेताचीच, कोणाचेही आर्थिक पाठबळ नसताना, कोणतीही ॲकॅडमी न लावता फक्त जिद्दीच्या जोरावरच घरी अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे एमपीएससी परीक्षेतून पीएसआयपदी निवड झालेली पाटणे गावातील ती पहिली मुलगी आहे.


शितलचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर पाटणे येथे झाले. आर. बी. पाटील माध्यमिक विद्यालयातून दहावीला ८६ टक्के व बारावीला विज्ञान शाखेतून ६६ टक्के गुण मिळविले. एन. डी. पाटील महाविद्यालय पेरीड येथे बीएस.सी. ७२ टक्के गुण मिळवून पदवी प्राप्त केली. तिसऱ्या प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी घातली.


तिला आई-वडील, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, आर. बी. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एम.पाटील, एस. बी. डवंग, ए. एन. पाटील, अभिजित आपटे, बाबासो पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.