डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या पाचव्या पेटंटला मान्यता


कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली.

कोबाल्ट क्रोमियम स्तरित दुहेरी हायड्रोक्साईडवर आधारित सुपरकॅपॅसिटर इलेक्ट्रोड तयार करण्याच्या पध्‍दतीला हे पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे पाचवे पेटंट आहे.
डॉ. जे. एल. गुंजकर (रामानुजन फेलो) व प्रा. सी. डी. लोखंडे (रिसर्च डिरेक्टर) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या पद्धतीसाठी २०२० मध्ये संशोधकांनी पेटंट मिळवण्याबाबत अर्ज केला होता. विविध चाचण्यांमधून आणि २ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती २४ मार्च २०२२ रोजी संशोधकांच्या नावे हे पेटंट मंजूर झाले आहे. या संशोधनांतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण सुपरकॅपॅसिटर इलेक्ट्रोड तयार करण्याची पध्‍दत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.


विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी माहिती देताना सांगितले, “डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत निर्गमित झालेले हे पाचवे पेटंट आहे. जुलै २०२१ मध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या पहिल्या पेटंटला मान्यता मिळाली होती. त्यांनतर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधी मध्ये विद्यापीठाला मिळालेले हे पाचवे पेटंट आहे. विद्यापीठ आणि संशोधकांच्या दृष्टिकोनातून ही बाब विशेष आनंदाची, प्रेरणा देणारी व नवोदित संशोधकांना प्रोत्साहित करणारी आहे.”


सद्य स्थितीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात भारतातील नामांकित रामानुजन फेलोशिपवर संशोधनाचे कार्य करणारे तसेच यापूर्वीही पेटंट्सच्या संशोधन कार्यात सहभागी असलेले मुख्य संशोधक डॉ. जे. एल. गुंजकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, “सदरच्या पद्धतीद्वारे तयार केलेले इलेक्ट्रोड्स ऊर्जा साठवणुकीसाठी बनवल्या जाणाऱ्या सुपरकपॅसिटरमध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम आहेत. दुहेरी हायड्रोक्साईडवर आधारित सुपरकॅपॅसिटर इलेक्ट्रोड तयार करणे ही अत्यंत प्रभावी व नाविन्यपूर्ण पध्दत सद्य स्थितीत उदयाला येत आहे. त्यामुळे नवोदित संशोधकांनी या संशोधन क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करावे. सदरच्या संशोधनासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अर्थसहाय्य मिळाले होते.”
या संशोधनामध्ये मुख्य संशोधक डॉ. जे. एल. गुंजकर यांच्यासमवेत रिसर्च डिरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, संशोधक विद्यार्थी श्रीकांत सदावर, नवनाथ पडळकर, रोहिणी शिंदे आणि डॉ. रविंद्र बुलाखे, तसेच कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचा सहभाग होता.


पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र. कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिह जाधव, बायोटेक विभागप्रमुख डॉ. मोहन करुपाईल यांनी अभिनंदन केले.