जोतिबावर यंदा गुलाल- खोबऱ्याची उधळण होणार; सासनकाठ्या नाचणार

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दोन वर्षे झालेली नव्हती. यंदा मात्र जोतिबाची चैत्र यात्रा दणक्यात साजरी केली जाणार असून सासनकाठ्या वाजत-गाजत नाचवण्यात येणार आहेत तर गुलाल खोबऱ्याची उधळणही होणार आहे.

१६ एप्रिल हा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असून यावर्षी यात्रेवरील निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले असून यात्रा पूर्ण क्षमतेने भरणार आहे. यंदा दहा लाखापेक्षा जास्त भाविक डोंगरावर य दाखल होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा चैत्र यात्रेमध्ये बाहेरून येणाऱ्या अन्नपदार्थांच्याबाबत कडक नियम असणार आहेत. बाहेरून येणाऱ्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलधारकांना अन्न परवाना असणे आवश्यक आहे. तसेच स्टॉलधारकांना, व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असणे बंधनकारक आहे. तसेच यंदा मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी १७५ एसटी बसेसची सोय करण्यात येणार आहे.

दोन वर्षे यात्रा न झाल्याने परिणामी ग्रामस्थ , पुजारी , दुकानदार , व्यापारी यांना मोठा आर्थीक फटका सहन करावा लागला होता. जोतिबाची चैत्र यात्रा यंदा १६ एप्रिलला होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी तयारीचा आणि नियोजनाची आढावा बैठक घेतली. उपविभागीय अधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे प्रभारी सचिव शिवराज नायकवडी, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थान समितीचे दिपक म्हेत्तर आदी उपस्थित होते.