महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भराव्या, कधी कुणाचा नंबर लागेल सांगता येत नाही : चंद्रकांतदादा

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवल्या आहेत. कोणाचा कधी नंबर लागेल सांगता येणार नाही. किरीट सोमय्या त्यांचा कर्दनकाळ ठरले आहेत, असा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला.

चंद्रकांतदादा कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते काही आरोप करोत, तपास संस्थाची स्वायतत्ता आहे. काही जात्यात, काही सुपात आहेत तर जात्यात असणाऱ्यांचे पीठ झाले आहे.
माझी संजय राऊत यांच्याकडून चेष्टा केली जात आहे, ती त्यांच्या अंगलट येणार असून मी सामना वाचणे बंद केले आहे तर संजय राऊत यांच्यावर बोलणे बंद केले आहे.

उद्धव ठाकरेबद्दल बोलताना म्हणाले, अगोदर कोविडमुळे आता आजारपणामुळे निवांत आहेत. त्यांची कुंडली बघायची आहे, फार भाग्यवान आहेत. कशाचं सोयर सुतक नाही पण त्यांना कोणी हलवू शकत नाही, कारण सर्वांची मजबुरी आहे.

एसटीचा प्रश्न सोडवायचा असेल तर अजितदादांनी पुढाकार घ्यायला हवा. दादा तुम्ही श्रेय घ्या, पण एसटी कामगारांचा संप मिटवा, असे आवाहन चंद्रकांतदादा यांनी केले.