चक्क मुतारी गेली चोरीला; राशिवडे ग्रामपंचायतीची पोलिसात तक्रार

राधानगरी : पैसा, दागिने, गाडी चोरीला गेल्याच्या तक्रारी नेहमीच पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे येथील चक्क मुतारी चोरीला गेल्याची तक्रार ग्रामपंचायतीने राधानगरी पोलिसांत दाखल केली आहे.

राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावांत ग्रामपंचायतीने हनुमान मंदिर व ग्रामपंचायतीजवळ मुतारी उभारली होती.
हनुमान मंदिराजवळ शांतीनाथ लोखंडे व महादेव मगदुम या दोघांच्या इमारतींच्या मध्यभागी ग्रामपंचायतीच्या जागेवर असणारी मुतारी काल शुक्रवारी रात्री अज्ञातांनी जमीनदोस्त करत साहित्यांची विल्हेवाट लावल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

या घटनेची माहीती सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच रंगराव चौगले, ग्रामविकास अधिकारी विराज गणबावले यांना देण्यात आली. पोलीस पाटील उतम पाटील यांना बोलावुन घटनेचा पंचनामा करण्यात आला. याबाबत अज्ञाताविरुध्द राशिवडे ग्रामपंचायतीने राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. मुतारी पाडून गायब केल्याने तीन लाखाचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.