कुडित्रे प्रतिनिधी: दोनवडे येथे शनिवारी लॉज मालकाच्या खुनासाठी वापरण्यात आलेला गावठी कट्टा आरोपीने गुजरात मधून आणला असल्याची माहिती पुढे येत आहे. हा कट्टा आणण्यासाठी त्याने स्वतःच्या चारचाकी गाडीचाही वापर केला असल्याचे समजते.दरम्यान खून झालेल्या चंद्रकांत आबाजी पाटील यांच्यावर रविवारी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनाच्या या घटनेमुळे संपूर्ण करवीर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोनवडे व खुपिरे येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.मृत चंद्रकांत आबाजी पाटील यांचा सचिन शामराव जाधव वय 40 व दत्तात्रय कृष्णात पाटील वय 38 दोघेही राहणार खुपिरे ता. करवीर यांनी शनिवारी लॉजिंग मध्ये जाऊन खून केला होता या खुनात जाधव व पाटील यांनी वापरलेला गावठी कट्टा हा अंदाजे वर्ष ते दीड वर्षांपूर्वी गुजरात मधून स्वतः जाऊन आणल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन जाधव हा शेअर मार्केटिंग व्यवसाय करत होता त्यामधल्या आर्थिक देवाण घेवणीतून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सचिन यापूर्वी ए.एस. ट्रेडर्स या शेअर मार्केट कंपनीमध्ये काम करत होता. काही काळ त्याने अशाच पद्धतीची स्वतःची कंपनी सुरू केली होती. आलिशान गाड्या वापरण्याचा त्यांना शौक होता. या उद्योगात त्याने भरपूर पैसा मिळवल्याचीही चर्चा आहे पण कंपनी बंद पडल्याने सध्या तो आर्थिक अडचण होता.
दत्तात्रय पाटील हा त्यांचा मित्र असून गेल्या दोन दिवसात नियोजन करून दोघांनी चंद्रकांत पाटील यांचा खून केला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.मृत पाटील यांच्या मुलाच्या डोळ्यासमोरच ही घटना घडली त्यामुळे मुलगा दबावाखाली असून त्याची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खुपिरे सह दोनवडे परिसरात गुंडगिरी वाढली आहे पोलिसांचा यावर वचक कमी झाला आहे त्यामुळे आर्थिक फसवणूक ,खाजगी सावकारकी यासारखे प्रकार वाढले आहेत.