‘मातोश्री’ला ५० लाखांचे घड्याळ आणि दोन कोटीची भेट

मुंबई : आयकर विभागाच्या हाती काही शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही सापडली आहे. यात ‘मातोश्री’ला पन्नास लाख रुपयांचे घड्याळ आणि गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाकडून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर छापे टाकले होते. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय. जानेवारी महिन्यात किरीट सोमय्यांनी जाधवांवर आरोप केले होते. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचाही आरोपही सोमय्यांनी केला होता. यातच काही पुरावे आयकर विभागाला सापडले आहेत.

आयकर विभागाच्या हाती शिवसेना नेते यशवंत जाधव यांची डायरी लागली आहे. यात ‘मातोश्री’ला पन्नास लाख रुपयांचे घड्याळ आणि गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही मातोश्री आहे. यामुळे जाधवांनी ठाकरें यांना काही पैसै पाठवले का, त्यांच्यात काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला दोन कोटी रुपये दानधर्म करण्यासाठी आईला दिल्याचा खुलासा जाधव यांनी केला आहे.