सरुड : शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याने परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. अक्षय गावकर (वय २९, रा. रामनगर, ता. जोयडा, जि. कारवार, राज्य कर्नाटक) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सहदेव थाणु यादव (झारखंड) याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गालगत म्हसोबा पॅाईंट परिसरात बॉक्साईट संकलनाचा ठिय्या आहे. येथे भूमी रिसोर्सेस प्रायव्हेट लि. या कंपनीच्या माध्यमातून कार्यरत मशिनरीवर कर्नाटक राज्यातील अक्षय गावकर हा परप्रांतीय तरुण व्हील लोडर म्हणून तर झारखंड राज्यातील सहदेव यादव हा पोकलँड ऑपरेटर म्हणून काम करतात. संबंधित दोघांमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या वादात यादव याला आई बहिणीवरून अक्षय गावकर याने शिवीगाळ केली. या रागातून यादवने केबिनजवळच पडलेल्या लोखंडी पाईपने अक्षय गावकर याच्यावर हल्ला चढवला. यामध्ये कपाळावर, डोळ्याजवळ तसेच डाव्या कानाच्या मागे वर्मी घाव बसल्याने अक्षय गावकर हा जागीच ठार झाला.
हल्लेखोर सहदेव यादव याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. याबाबत भूमी रिसोर्सेस प्रायव्हेट लि. या कंपनीचे सुपरवायझर बसवराज कल्लाप्पा पाटील (वय ३९, मुळ पत्ता सिंगीगखोप, ता. खानापूर, जि. बेळगाव, सध्या रा. शाहूवाडी, ता. शाहूवाडी) यांनी फिर्याद दिली.