‘स्वाभिमानी’त आरोपांच्या फैरी; संघटनेत पुन्हा दुफळी !

कोल्हापूर : सदाभाऊ खोत यांची मंत्री असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता संघटनेचे एकमेव आमदार असलेले देवेंद्र भुयार यांची राजू शेट्टी यांनी हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात शेट्टी यांनी केवळ सहा तासच प्रचार केल्याचा पलटवार करत राजू शेट्टीं यांना कॅबिनेट मंत्री हवे होते, असा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर स्वाभिमानाच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदी सदाभाऊ खोत यांची वर्णी लागली. पण त्यांची भाजपशी वाढणारी जवळीतेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली होती. सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाली. त्यानंतर सदाभाऊंनी भाजपबरोबर सोयरीक जमवली आणि एके काळचे जिवाला जीव देणारे जिवलग मित्र कट्टर राजकीय वैरी बनले.

  तर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची संघटनेतून हकालपट्टी केल्याची घोषणा केली.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला. आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेच्या कुठल्याही कामात सहभागी होत नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.

   राजू शेट्टी यांच्या आरोपाना देवेंद्र भुयार यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिले आहे, राजू शेट्टी यांनी माझ्या मतदारसंघात सहा तासच प्रचार केला होता. मला निवडून आणले म्हणून सांगणाऱ्यांना स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारांची डिपॉझिट का वाचविता आली नाही? असा सवाल भुयार यांनी केला आहे. राजू शेट्टी यांनी आतापर्यंत सोयीच्या भूमिका घेतल्या आहेत. आता पुन्हा भाजपशी जवळीक साधायची आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शेट्टी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र, शेट्टी कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना कॅबिनेट मंत्री करणे शक्य शरद पवार यांनी सांगितले होते.

त्यावेळी सदाभाऊ खोत यांची भाजपबरोबर जवळीक वाढली होती तर आता देवेंद्र भुयार यांची राष्ट्रवादीबरोबर जवळीक वाढली आहे. अगोदर सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांच्यात अजूनही आरोपांच्या फैरी झडत आहेत. तर आता राजू शेट्टी व देवेंद्र भुयार यांच्यात आरोपांच्या फैरीची सलामी झाली आहे.