राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार !

मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत सांगितले.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत धोरण ठरविण्यात आले आहे. राज्यात एकूण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सुमारे ६५ हजार शाळा आहेत,  त्यापैकी सद्यस्थितीत १६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. उर्वरित शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. याकरीता येणारा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी, सीएसआर फंड, लोकसहभागातून तसेच लोकप्रतिनीधींच्या विकास निधीमधून करण्यात येणार आहे.