उत्तरच्या रिंगणात करोडपती उमेदवार !

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख दोन उमेदवार करोडपती आहेत. कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांची संपत्ती ८६ कोटींच्यावर आहे तर भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांची संपत्ती २१ कोटी आहे. उमेदवारी अर्जासमवेत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.

  कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांची ८६ कोटी २३ लाख रुपयांची संपती आहे. त्यांच्याकडे १ लाख ५५ हजारांची रोकड आहे. बँकांत १ कोटी २३ लाख ४३ हजारांच्या ठेवी तर १ लाख ७२ हजारांचे शेअर्स आहेत. बचत योजनेत २८ लाख ३६ हजारांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे २५ लाख ७८ हजारांची वाहने आहेत. ५७ लाख ३३ हजारांचे दागिने आहेत. ३१ कोटी ४ लाख ९८ हजारांची जाधव इंडस्ट्री आहे. इमारत भूखंड, प्लॉट, वाणिज्य वापराच्या इमारती तसेच अन्य कंपन्यांतील भागीदारीतील मिळकती अशी सुमारे ४ कोटी ६० लाखांची स्थावर मिळकत आहे.

नाना कदम यांची संपत्ती २१ कोटी

भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांची २० कोटी ८२ लाख रुपयांची संपत्ती आहे. कदम यांच्याकडे ४ लाख ३२ हजारांची रोकड आहे. ६१ लाख १६ हजारांच्या ठेवी तर १० लाख ७५ हजारांचे शेअर्स आहेत. बचत योजनेत २ लाख ८० हजारांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे २५ लाख ६४ हजारांची वाहने असून २३ लाख ७६ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. सुमारे ३ कोटी २६ लाख ८३ हजारांची स्थूल मालमत्ता आहे. कदम यांच्याकडे शेती, निवासी इमारत, भूखंड, प्लॉट, वाणिज्य वापराच्या इमारती तसेच अन्य कंपन्यांतील भागीदारीत असलेल्या मिळकती अशी सुमारे १७ कोटी ५५ लाखांची स्थावर मिळकत आहे.