शाळेत शिरुन ११ वर्षांच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार

पुणे :  पुणे शहरातील जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन नराधमाने ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, ११ वर्षांची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकत आहे. बुधवारी सकाळी ती शाळेत गेली असता एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख दाखवण्याच्या बहाणा करत तिला ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. तिथे त्याने तिचे तोंड दाबून बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास बघून घेण्याची, अशी धमकी देऊन तेथून त्याने पलायन केले. हा प्रकार पिडीत मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर शिक्षिकाना हा प्रकार समजला. त्यांनी त्या मुलीच्या आईला शाळेत बोलावून घेऊन माहिती दिली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्‍या पिडीत मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे म्हणाल्या,, शाळेत सीसीटीव्ही बसवलेले असून त्या दृष्टीने आम्ही तपास करीत आहोत.