वाकरेत पै. शंकर तोडकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

वाकरे (प्रतिनिधी) : वाकरे (ता. करवीर) येथील पै. शंकर तोडकर हायस्कूलमध्ये उपमहाराष्ट्र केसरी कै. पैलवान शंकर तोडकर यांना ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष के. एच. माने व संचालक भगवंत सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

     श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे संचालक ए. बी. बिरंजे म्हणाले, स्व. पैलवान शंकर तोडकर हे वाकरे गावचे भूषण होते. गतिमान व प्रेक्षणीय कुस्त्या करण्यात त्यांची ख्याती होती. कुस्ती क्षेत्रात प्रामाणिक व खिलाडू वृत्तीने केलेल्या वाटचालीमुळे कुस्ती क्षेत्रात त्यांच्या नावाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे. .

     मुख्याध्यापक बी. बी. पाटील म्हणाले, वाकरे गावाला शाहू महाराजांच्या काळापासून कुस्तीची परंपरा असून स्वर्गीय पैलवान शंकर तोडकर यांनी चटकदार कुस्त्या करून गावाचे नाव देशभर केले.

      सरपंच वसंत तोडकर, ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे,  संचालक भगवंत सूर्यवंशी, सदाशिव लोहार, डी. एच. शिंदे, एस. ए. बिरंजे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक डी. एस मोरे यांनी केले. आभार एस. पी. पाटील यांनी मानले.