कोल्हापूर उत्तर निवडणुकीसाठी राजेश क्षीरसागर यांनी घेतली ‘ही’ भुमिका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची जागा काँग्रेसला देताना दुःख वाटतंय. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मी काल, आज आणि उद्या शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. आज (रविवारी) शिवसेना कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

कोल्हापूर उत्तर विधानासभा पोटनिवडणुकीत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

पुढे बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले की, आपण यापूर्वी ही शिवसेनेसोबत होतो आणि आता आहे आणि यापुढेही रहाणार. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसला देताना दुःख होतय. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मानून काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी क्षीरसागर यांनी पदाधिकाऱ्यांना या पुढच्या काळात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन करत २०२४ ला शिवसेना ही जागा परत मिळवेलं असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. राजेश क्षीरसागर यांनी ही निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. कार्यलयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.