कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना या पोटनिवडणुकीत विजयी करू असे प्रतिपादन ना.सतेज पाटील यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (रविवारी) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात हा मेळावा घेण्यात आला.
पुढे बोलताना ना.पाटील म्हणाले कि, हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांना भेटलो. जयश्री जाधव यांच्या माध्यमातून शहरात पहिली महिला आमदार होऊदे अशी विनंती केली.पण भाजपनेही ही निवडणूक लावली. कोल्हापूरची जनता भाजप धार्जिण नाही हे दाखवून देण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे असे म्हणत ना. पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
या मेळाव्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, खा. धैर्यशील माने,आ. राजूबाबा आवळे, आ.ऋतुराज पाटील, आ.जयंत आसगावकर,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, पीपल्स रिपब्लिकन ऑफ इंडियाचे जिल्ह्याध्यक्ष डी. जी.भास्कर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.