राजेश क्षीरसागर यांची नाराजी उघडं ; महाविकास आघाडीच्या मेळाव्यात गैरहजर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (रविवारी) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची अनुपस्थिती हा चर्चेला विषय ठरला. आणि यातून ते अप्रत्यक्षरित्या नाराज असल्याचे ही स्पष्ट झाले.

स्वर्गीय आ.चंद्रकांत जाधव यांच्या जाण्याने कोल्हापूर उत्तर या मतदार संघात पोटनिवडणूक लागली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने महाविकास आघाडी अंतर्गत मैत्रीपूर्ण लढत व्हावी, यासाठी क्षीरसागर आग्रही होते. परंतु पक्षीय स्तरावर हा मतदारसंघात काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाल्याने क्षीरसागर नाराज झाले. तेव्हापासून क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल आहेत.

आजच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव,सचिन चव्हाण कार्यकर्त्यांसह राजेश क्षीरसागर यांची भेट घेण्यासाठी शनिवार पेठेतील निवासस्थानी गेले होते पण त्यांची भेट होऊ शकली नाही.

माजी आमदार राजेश क्षीरसागर पूर्ण तयारीनिशी या निवडणूक रिंगणात उतरणार होते. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत ही जागा काँग्रेस पक्षाला सोडली. या निर्णयाने शिवसैनिक काहीसे नाराज आहेत. आज झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात राजेश क्षीरसागर उपस्थित राहतील असे महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना वाटले. परंतु, राजेश क्षीरसागर यांनी या मेळाव्यास गैरहजर राहून आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.