पाच हजाराची लाच घेताना नेसरीतील सहाय्यक फौजदार जाळ्यात

कोल्हापूर : अवैध धंद्यावर छापा टाकल्यानंतर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना नेसरीतील सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. पुंडलीक विठ्ठल पाटील (वय ५१, रा. कडलगे, ता. चंदगड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नेसरी येथील तक्रारदाराची अवैध व्यवसाय असल्याची माहिती मिळाल्याने नेसरी पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली होती. तक्रारदार यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी सहाय्यक फौजदार पुंडलिक पाटील यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता पोलीस ठाण्याच्या आवारातच पुंडलिक पाटील यांना पाच हजार रुपयांचे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.