इचलकरंजी (प्रतिनिधी) : यंत्रमाग कामगारांची मजुरीवाढ व यंत्रमाग उद्योगातील कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी शनिवार, १९ रोजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर निदर्शने करण्याची घोषणा करण्यात आली.
आंदोलन सुरू होऊन दोन महिने झाले कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करुन सकारात्मक निर्णय घेतो, असे आश्वासन दिले होते पण त्यांनी अद्याप बैठक लावलेली नाही, तसेच यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची घोषणा केलेली नाही. म्हणून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कामगार युनियनच्या दबावामुळे कामगारांची सात पैसे मजुरी वाढ करण्याची घोषणा जानेवारी २०२२ रोजी उशीरा का होईना केली गेली. मात्र अजून यंत्रमाग कामगारांना प्रत्यक्षात मजुरीवाढ झालेली नाही. कामगारांचे महागाईमुळे हाल सुरू आहेत. २०१३ च्या मोठ्या संपानंतर यंत्रमाग कामगारांना दोन महागाई भत्ते एकत्रित करून दरवर्षी या महागाई भत्त्याची पीस रेटमध्ये वर्गवारी करून ती मजुरी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांनी घोषणा करायची असे ठरले होते, ती घोषणा झाली पण प्रत्यक्षात कामगारांना मिळत नाही.
यावेळी कॉ. दत्ता माने, कॉ.भरमा कांबळे , आनंदा गुरव, राजेंद्र निकम, ,धोंडीबा कुंभार, हनमंत लोहार, रियाज जमादार, सुनील बारवाडे, शिवाजी भोसले, प्रदिप शाहू, सुभाष कांबळे , बंडा सातपुते सदाशिव यादव उपस्थित होते.