जिल्हा परिषदेच्या विविध पुरस्कारांचे 19 मार्च रोजी शिवाजी विद्यापीठात वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागातील, उल्लेखनीय कार्य केलेल्याना राजर्षी शाहू पुरस्कार व जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी 19 मार्च रोजी 11 वाजता शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात मंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.


ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. आरोग्य विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम होणार आहे.

आरोग्य विभागांमध्ये सर्वांग सुंदर दवाखाना,अधिकारी कर्मचारी तसेच फलोरेन्स नाईटिंगल उत्कृष्ट कामकरणारी परिचारिका , आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक , आरोग्य अभियानात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात 250 हून अधिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंत शिंपी, बांधकाम सभापती वंदना जाधव, महिला बालकल्याण सभापती शिवानी भोसले, शिक्षण सभापती रसिका पाटील, समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत.