इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील यंत्रमाग धारकांना येणाऱ्या अन्यायी वीज दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी व भाजपा विणकर आघाडीच्यावतीने वीज वितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील सर्व यंत्रमाग धारकांना पाठवलेली दुप्पट-तिप्पट लाईट बिल आल्याने कारखानदारांना ते परवडणारे नाही. तसेच कोणाचेही कनेक्शन कट करू नये, सदरची दरवाढ तात्काळ रद्द करावी. विज बिलात मिळत असलेली सवलत सरकारने बंद करून यंत्रमाग धारकांच्यावर जो अन्याय केला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी भाजपा विणकर आघाडीच्यावतीने भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. अनिल डाळ्या व विणकर आघाडीचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून वीज वितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
ॲड. अनिल डाळ्या म्हणाले, सरकारने २१२ कोटी महावितरणला आदा केल्याचे जाहीर केले आहे असे म्हणत आहे. तरीही महावितरण लाईट बिल वाढीव दराने कारखानदारांना पाठवत आहे. याचे गौडबंगाल काय आहे, असा सवाल यावेळी केला. तिप्पट लाईट बिल वाढवून आले आहे. ते भरणे शक्य नसून कारखानदारावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचे यंत्रमाग धारकांचे लाईट बिलातील अनुदान रद्द केले असुन कारखानदारावर अन्याय केला आहे.
विणकर आघाडी अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे म्हणाले, आघाडी सरकार साध्या यंत्रमाग धारकांना जगु न देण्याचा जो विडा उचलला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी येऊन ज्या मोठं मोठ्या घोषणा केल्या त्या कागदावरच राहिल्या. उलट त्यांनी सर्वच यंत्रमाग धारकांचे सरसकट अनुदानच रद्द केले. यंत्रमाग धारकांना वाढीव दराने आलेले वीज बिल तो भरू शकत नाही, आणि तो भरणारही नाही.
यावेळी दिपक राशीनकर, अरविंद शर्मा, शहाजी भोसले, शशीकांत मोहिते, सतिश पंडित, प्रवीण रावळ, तमन्ना कोटगी, गणेश परीट, प्रितम बोरा, चिदानंद कोटगी, मनोज हिंगमिरे, दिपक पाटील, ऋषभ जैन, सुधाकर हेब्बाळे, राहुल निमणकर, उमाकांत दाभोळे, उत्तमसिंह चव्हाण, मनोज साळुंखे, संतोष कोटगी, सचिन कांबळे, राजू आडावकर, राहुल हंचाटे, मनिष खाडे, मदन लोखंडे, नागेश पुजारी, नागराळे, हमेंत वरुटे उपस्थित होते.