कोडोली : शासनाने संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशांच्या वाटणीतून झालेल्या भांडणात भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील आवळी पैकी पोवारवाडी येथे घडली. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७० आवळी पैकी पोवारवाडी) असे मृताचे नाव आहे. तर खूनप्रकरणी चौघांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीसांनी मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी भगवान महादेव पाटील आणि संशयित आरोपी प्रविण पाटील, प्रदीप पाटील, विश्वास पाटील यांची आवळी पैकी पोवारवाडी येथे घरे एकमेकाच्यासमोर आहेत. त्यांच्यात शासनाकडून भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला म्हणून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन वाद सुरु होता. फिर्यादी भगवान पाटील काल रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दारात हातपाय धुत असताना संशयित आरोपी प्रविण पाटील याने शिवीगाळ केली. संशयित आरोपी प्रविण पाटील, प्रदीप पाटील, विश्वास पाटील व पैजारवाडी येथील दिलीप शामराव गराडे यांनी भगवान पाटील यांना मारहाण केली. हा वाद ऐकून त्यांची पत्नी व मामा रघुनाथ ज्ञानु पोवार भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी संशयितांनी रघुनाथ पोवार यांना लाथाबुक्यासह काठ्या व दगडाने मारहाण बेदम केली. यात ते जागीच ठार झाले. त्यानंतर भगवान पाटील यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांचा मुलगा प्रतिक यालाही मारहाण केली.
या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोली पाटील ठाण्यात फिर्याद दिली. कोडोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित आरोपींना अटक केली आहे.