पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; पाच वारकरी ठार, ३५ जखमी

सोलापूर : आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरला चाललेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भरधाव आलेल्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील पाच वारकरी ठार झाले तर ३५ जण जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी, तुळजापूर तालुक्यातील कदमवाडीतील ३० ते ४० भाविक ट्रॅक्टरमध्ये बसून आमलकी एकादशीनिमित्त सोलापूरमार्गे पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगांव कोंडी पुलावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक तसाच वेगाने समोरून जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला धडकला आणि ट्रॅक्टरला जवळपास १ हजार फूट लांब फरफटत नेले. त्यामध्ये ट्रॅक्टर मधील जवळपास ३० ते ४० महिला पुरूष रस्त्यावर पडत गेले आणि रस्त्याच्या पुलाच्या कडेला लावलेले लोखंडी ग्रील पूर्णपणे फाटत गेले. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरमधील लोक कोण कुठे पडले आहे हे समजत नव्हते. रस्त्यावर रक्ताचा सडा आणि माणसांचे अवयव पडले होते. सर्वत्र विव्हळण्याचा आवाज येत होता. यात ३० ते ४० प्रवासी गंभीर जखमी झाले असून यामधील ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात रविवारी रोजी रात्री घडला. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.