अतिशय फसवा आणि निराशाजनक अर्थसंकल्प : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्यासाठी फसवा व निराशाजनक आहे.  या सरकारने तीन वर्षापूर्वी नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस तरतूद केलेली नसल्याची टीका, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे केली.

  घाटगे म्हणाले, तसेच मूळ कर्जमाफी योजनेपासून 45 टक्के शेतकरी अद्याप वंचित आहेत. त्यांना कसलीही मदत नाही. मागील बजेटमध्ये अशाच घोषणा केल्या होत्या त्या या सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. कृषीपंपाच्या वीज बिलाबाबतसुद्धा कोणतेही ठोस, धोरण नाही. सत्तेत येताना या सरकारने केलेल्या कोणत्याही घोषणा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी ठोस पाऊले टाकलेली नाहीत.

ते पुढे म्हणाले, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून संबोधण्यात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही भुमिका घेतलेली नाही. विशेष म्हणजे केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केले. त्यानुसार इतर राज्यानीही तो कमी केला. पण महाराष्ट्र सरकारने तो कमी केलेला नाही. महागाईच्या खाईत होरपळत असलेल्या सर्वच घटकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकारने निराशाजनक अर्थसंकल्प सादर करून केले आहे.