उधारीचा वायदा करून जबाबदारी टाळणारा अर्थसंकल्प : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

चंद्रकांतदादा म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा यापूर्वीच्या अर्थसंकल्पात केली होती पण त्याची अंमलबजावणी केलीच नाही, याची कबुली अर्थमंत्र्यांनी दिली आणि आता आगामी वर्षात वचनपूर्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावर आली आणि विकासाचा वेग वाढला म्हणून कालच आर्थिक पाहणी सादर करताना दावा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना द्यायच्या निधीबाबत जबाबदारी का पार पाडली नाही आणि आता उधारीचा वायदा का केला हे सांगितले पाहिजे.

  ते पुढे म्हणाले, एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे हे अर्थमंत्री कबूल करतात पण संपामुळे बंद पडलेली एसटीची चाके पुन्हा सुरू करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्या ऐवजी केवळ नव्या बसेससाठी घोषणा करून दिशाभूल केली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून सामान्य माणसाला दिलासा देण्याची जबाबदारीही अर्थसंकल्पात टाळली आहे. विकासाची पंचसूत्री सांगताना अर्थमंत्र्यांनी अल्पसंख्यांक समाजाचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्यासाठीची योजना सांगितली. पण त्यांना मराठा व धनगर समाजांचा विसर पडला. या समाजांसाठीही काम करण्याची या सरकारची जबाबदारी आहे.