कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्य न्यायमूर्ती सकारात्मक

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूूर्तीं दीपांकर दत्ता सकारात्मक आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी आज सायंकाळी साडे पाच वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या बैठक हॉलमध्ये मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती ए.ए. सय्यद , न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांची कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने भेट घेतली.

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू व्हावे, ही सहा जिल्ह्यांतील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत यापूर्वीही उच्च न्यायालयाशी पत्रव्यवहार झाला आहे. व्यापक जनहित लक्षात घेऊन कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेचा विचार करावा. खंडपीठ होईपर्यंत येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेच सुरू करावे, अशी विनंती करण्यात आली. यावर सर्किट बेंचबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुंबई मुख्य न्यायमूूर्तीं दीपांकर दत्ता यांनी सांगितले.
या बैठकीला महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, संग्राम देसाई, खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष गिरीश खडके, निवृत्त न्यायमूर्ती तानाजीराव नलवडे, संतोष शहा, युवराज नरवणकर, श्रीकांत जाधव, प्रशांत चिटणीस, प्रकाश मोरे, विजयकुमार ताटे-देशमुख आदी उपस्थित होते.