मराठा समाजातील गरिबांच्या न्यायासाठी सदैव कार्यरत राहणार : खा. संभाजीराजे


कोल्हापूर : मराठा समाजातील ७० टक्के जनता ही गरीब असून त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिली.
मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मुंबई येथे उपोषण करून त्या मागण्या सरकारला मान्य करायला लावल्यानंतर खा.संभाजी राजे यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी भवानी मंडप येथे झालेल्या कार्यक्रमात संभाजीराजे बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, हेतू प्रामाणिक असेल तर कोल्हापूरकर एखाद्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो याचा प्रत्यय मला आज तुमच्या माझ्यावरील प्रेमामुळे आला. आज मला आपण छत्रपती घरण्यावरील प्रेमाची आठवण करून ताकद दाखवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजाच्या भल्यासाठी स्वराज्य निर्माण केले. त्यांची परंपरा छत्रपती शाहू महाराज यांनी जोपासली. मी देखील शाहू महाराजांचा वंशज असल्यामुळे बहुजन समाजाच्या भल्यासाठी सदैव कार्यरत राहीन. मी मराठा समाजाचा सेवक असून बहुजन समाजाचे नेतृत्व करतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार, मराठा मोर्चा चे समन्वयक धनंजय जाधव यांची भाषणे झाली.