आंबा घाटात कार दरीत कोसळून मायलेक ठार; सहा जखमी

आंबा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा घाटात चालकाचा ताबा सुटल्याने कार तीनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सांगलीतील महिलेसह तिच्या तीन महिन्याच्या लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहाजण जखमी आहेत. मृत्यु झालेल्या महिलेचे नाव सृष्टी संतोष हरकुडे (वय ३२) तर शिवांश संतोष हरकुडे (वय ३ महिने) असे बालकाचे नाव आहे. अपघात आज दुपारी दोनच्या सुमारासास घडला.

 अधिक माहिती अशी, सांगली येथील डॉ. हरकुडे व डॉ. फुलारे कुटुंबीय दोन कारमधून गणपतीपुळेला निघाले होते. कारमध्ये संतोष हरकुडे (वय ३५) पत्नी सृष्टी (वय ३२) मुलगा शिवांश (वय ३ महिने) मुलगी मन्मिता (वय ३) सागर हरकुडे, पत्नी जयश्री, डॉ. प्रताप तंबाखे (वय ७०) डॉ. संगमेश फुलारे (वय ३) पत्नी डॉ. दीप्ती (वय ३३) मुलगी आज्ञा (वय ६) वर्षे आणि तीन वर्षाचा रेहान प्रणव सुभेदार प्रवास करत होते. विसाव्या पॉइंट एक कार गणपतीपुळेच्या दिशेने गेली. मागून आलेल्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. अपघाताची माहिती समजताच साखरपा पोलिस व स्थानिकांच्या मदतीने मदत मोहीम राबवली. यामधील जखमी झालेल्या तीन लहान बालकांना दरीतून काढून कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.